नागपूर: वृद्धांच्या सुरक्षेसाठी आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त अश्वती दोरजे यांनी विशेष भर दिला आहे. शहरातील वृद्धांच्या समस्या लवकरात लवकर जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे
सायबर गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचेही उघड झाले आहे. तसेच एकट्या असलेल्या वृद्धांना शेजारी किंवा टारगट युवकांचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस विभाग सकारात्मक प्रयत्न करीत आहे.
शहरातील वृद्धांच्या समस्या लवकरात लवकर जाणून घेऊन सोडविण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या कक्षात एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. वृद्ध व्यक्ती तक्रार किंवा समस्या घेऊन आल्यास जेष्ठ नागरिक कक्षाकडून तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. ती समस्या सुटेपर्यंत कक्षातील अंमलदार जेष्ठांना सहकार्य करतील.
वरिष्ठ अधिकारी आढावा घेणार
ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींची जेष्ठ नागरिक कक्षातील नोंदवहीत नोंद केली जाणार आहे. ज्येष्ठांची कुठलीही तक्रार असेल, तर त्यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यातून विशिष्ट कालावधीत काय कारवाई झाली, त्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करणे शक्य होणार आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतः लक्ष घालणार असल्यामुळे कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांवरही वचक राहणार आहे