• Thu. May 1st, 2025

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होणार?

Byjantaadmin

May 7, 2023

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेस आमदार नाना पटोले हे दोघे सातत्याने महाविकास आघाडी आणि आगामी मुख्यमंत्री यावर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. तसेच पटोले म्हणाले होते की, कुठल्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आलेल्या या प्रतिक्रियांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असं अलिकडेच म्हणाले होते. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी शरद पवार यांना नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता. शरद पवार म्हणाले, साधारणपणे तसंच असतं. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसं काही चुकीचं नाही. परंतु आमची (महाविकास आघाडीची) याबाबत अशी काही चर्चा झालेली नाही. ते त्यांचं (नाना पटोले) व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अलिकडेच म्हणाले होते की, “महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असणार आहे, हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तितक्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळेच मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो”. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले णाले की, “जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणांच्या आधारावर हे वक्तव्य केलं हे मला माहिती नाही. ज्यांच्या आमदारांची संख्या जास्त असते, त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षाला यावर चर्चा करायची नाही”.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *