मुंबई : शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उफाळून आलेल्या तीव्र भावना पाहता पुण्याला होणाऱ्या वज्रमूठ सभेसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पुण्यातील या सभेची जवाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र आता या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबतची साशंकता महाआघाडीतील नेत्यांना सतावत आहे.
महाविकास आघाडी उभी करण्याचे श्रेय सर्वच नेते शरद पवार यांना देतात. मात्र आज शरद पवार यांनी पक्षाच्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे काय होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते खासगीत मान्य करीत आहेत. महाविकास आघाडीतर्फे घेण्यात येणाऱ्या वज्रमूठ सभांपैकी प्रत्येक पक्षाने दोन सभांची जबाबदारी घेतली होती. औरंगाबाद व मुंबईतील सभेच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेची होती; तर नागपूर व कोल्हापूर येथील सभांची जबाबदारी काँग्रेसने घेतली होती. पुणे व नाशिक येथील सभा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित करणार होती. येत्या दोन आठवड्यांमध्ये पुणे येथे वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ही सभा बारगळण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले, ‘शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही सभा आयोजित करण्यात काही अडचणी येत असल्यास शिवसेना व काँग्रेस हे दोन पक्ष संयुक्तरित्या त्याची जबाबदारी घेऊन याचे आयोजन करू शकतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे. ते सभेला उपस्थितच राहिले नाहीत, तर माविआमध्ये फूट पडल्याचा वा बेबनाव असल्याचा चुकीचा संदेश जनतेपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सभेत सहभागी होणार याची खात्री जरी दिली तरी सभा नक्की होऊ शकते.’