• Tue. Apr 29th, 2025

दादा-ताईंनी समजावल्यानंतरही कार्यकर्ते ऐकेना, अखेर पवारांचा फोन आला अन्…Video

Byjantaadmin

May 2, 2023

मुंबई, 2 मे : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवारांनी निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले. या सगळ्यांनी शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते उपोषणाला

अजित पवार तसंच प्रफुल्ल पटेल यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नव्हते.दुसरीकडे वाय.बी.चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्ते उपोषणाला बसले. या कार्यकर्त्यांना समाजवण्यासाठी सुप्रिया सुळे बाहेर आल्या, पण कार्यकर्ते ऐकत नव्हते. अखेर थोडावेळाने सुप्रिया सुळे आणि अजित पवार दोघं बाहेर आले

अजित पवार, सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कार्यकर्ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हते. अखेर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना फोन केला. यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी आधी खाऊन घ्यावं, असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

आम्ही सगळे मिळून शरद पवारांशी चर्चा करू आणि त्यांना हा निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह करू, असं आश्वासन सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं.

शरद पवार ठाम

‘मी जे सांगितलं, आपण सगळे एकत्रित काम करणार आहोत. मी फक्त पदावरून बाजूला होत आहे. तुमच्यापासून मी बाजूला जात नाही’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed