मुंबई : महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंमुळे एसटीची प्रवासीसंख्या वाढली आहे. या प्रवाशांना स्वच्छ बस स्थानकात वावर करता यावा, यासाठी महामंडळाने राज्यात स्वच्छ बस स्थानक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीची स्थानके म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधी येणारे स्वच्छतागृह आणि अस्ताव्यस्त विखुरलेला कचरा, ही ओळख पुसून टाकण्यासाठी महामंडळातर्फे ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तब्बल वर्षभर चालणाऱ्या या महिमेत कोट्यवधींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अर्थात एक मेपासून मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाणे-पुणे मार्गावरील ‘ई-शिवनेरी’लादेखील याच दिवशी झेंडा दाखवण्यासाठी महामंडळाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
राज्यात ५८० एसटी स्थानके आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असते. एसटीच्या योजनांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र स्थानक परिसर अस्वच्छ, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. यामुळेच ही स्वच्छ बस स्थानक मोहीम राबवण्यात येत आहे. एक जून २०२४पर्यंत स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी करून स्वच्छ बस स्थानकाची निवड करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच स्वच्छ बस स्थानकांना कोट्यवधींची बक्षिसे देण्यात येणार आहे, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्रीपद रिक्त आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांनी महामंडळाची बैठक बोलावून एसटी स्थानकांत स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या होत्या.
‘ई-शिवनेरी’च्या चाचणीबाबत गुप्तता
एसटी महामंडळाच्या प्रीमियम सेवाश्रेणीत शिवनेरी बसचा समावेश होतो. महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस दाखल झालेली आहे. तिची चाचणी घेण्यासाठी मुंबई सेंट्रलहून शुक्रवारी सायंकाळी ही बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. लोणावळा घाट सहजपणे पार करण्याची क्षमता बसमध्ये आहे का, याची पाहणी चाचणीअंती करण्यात येणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष शेखर चन्ने आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे. चाचणीबाबत महामंडळाने गुप्तता पाळली आहे.