Beed : शेतकऱ्यांच्या राज्यातील वाढत्या आत्महत्या आणि त्याकडे सत्ताधाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष यातून उद्विग्न झालेल्या एका शेतकरी (Farmer) पुत्राने थेट आपल्या रक्ताने राज्यपालांना पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वगुण संपन्न आहेत, मग तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? असा सवाल या शेतकरी पुत्राने पत्रातून केला आहे. राज्यपालांना स्वतःच्या रक्ताने लिहलेले पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील केज तालुक्याच्या दहिफळ बडमाऊली येथील हा तरुण शेतकरी आहे. श्रीकांत विष्णू गदळे असे त्याने नाव असून राज्यात व जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे तो दुःखी आहे. एका उद्विग्नतेतून गदळे याने हे पत्र लिहले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा लिहून पत्रातील शाई संपली, लोकशाही असलेल्या जगात शेतकऱ्याच्या पत्राला किंमत राहिली नाही.
त्यामुळे मी किसान पूत्र माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित आहे. marathwada त्याला तरी लोकशाहीत किमंत आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री सर्वगुण संपन्न आहेत, मग तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? राज्यपाल बदलले, नवे आले, पण जुने प्रश्न नव्या राज्यपालांना सोडवता येतील का? आम्हाला अनुदानाची भीक नको, शेतमालाला योग्य भाव द्या.
मला आमदार करा, मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवतो आणि खऱ्या अर्थाने देश कृषीप्रधान बनवतो, असे देखील गदळे याने आपल्या पत्रात नमूद केले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र राज्यापाल रमेश बैस यांना पाठवण्यात आले आहे. या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.