बारावी बोर्डाचा निकाल साधरण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ होणार आहे. काही शिक्षक संघटनांनी सुरूवातीस पेपर तपासणी करण्यास घातलेल्या बहिष्काराचा कोणताही परिणाम राज्य बोर्डाच्या निकालावर होणार नाही, असे ही सांगण्यात येत आहे.
दोन्ही ही निकाल नियोजित वेळेनुसार जाहीर केले जाणार आहेत. निकालाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.
सद्यस्थितीत इयत्ता बारावी आणि दहावीच्या पेपर तपासणीचं काम राज्यभरात सुरू आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परिक्षा सुरू होताच, आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला होता. यादरम्यान बारावीचे पाच पेपर्स पूर्ण होऊन, पेपर तपासणीच्या कामाला सुरूवात झाली होती.
शिक्षक संघटनांच्या या भूमिकेमुळे जवळपास आठवडाभर पेपर तपासणाच्या कामाला खंड पडला होता. या दरम्यान विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोनातून शिक्षक संघटनांच्या मागण्यांना शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देवून, पेपर तपासणीचे काम पुन्हा सुरू केले.
शिक्षक महासंघाचे मुकुंद आंदळकर म्हणाले, ‘बहिष्काराचा कालावधी २१ फेब्रुवारी ते २ मार्च एवढ्या कालावधीसाठी होता. शिक्षक यांनाही आपल्या जबाबदारीचे भान आहे, शिक्षणमंत्र्यांनी आमच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला, तेव्हा आम्ही पेपर तपासणीचे कामाला तात्काळ सुरूवात केली. नियामका आणि नंतर संगणकीय कामे वेळेवर पूर्ण करून ती, मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
७५ टक्के पेपर तपासणीचे काम पूर्ण :
माध्यमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे याबाबत म्हणाले,’दहावीच्या पेपर तपासणी सुद्धा वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांतील जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त पेपर तपासणीचे काम सुरू आहे.
आतापर्यंत तपासणीचे ७० ते ७५ टक्के काम झाले आहे. बारावीच्या पेपर तपासणीचं कामसुद्धा जवळपास ४० हजार शिक्षक वेगाने करत आहेत. तर दहावीच्या पेपर तपासणीच्या कामाला दीड एक लाख शिक्षक लागले आहेत. प्रत्येक दिवशी बारावीची २५ पेपर प्रत्येक शिक्षकाने तपासतील, असेही असेही संकेत शिक्षकांना दिले आहेत, असे कानडे यांनी सांगितले.