महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण, हे सांगण्याची स्पर्धाच जणू राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागलेली आहे. नागपूर नजीकच्या बुटीबोरीमध्ये काल भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर झळकले होते. त्यानंतर आज (ता. २६) नागपुरात अजित दादा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. काल (ता. २५) बुटीबोरीत फडणवीस भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकल्याने पुन्हा राज्यभर चर्चा सुरू झाली.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, असे पोस्टर नागपूर शहरात लावले. तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. २०२४मध्ये ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’, याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नागपूरनजीकच्या बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर लावले, तर आज राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांनी अजित पवारांचे पोस्टर लावले. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काही घडामोडी घडणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच काही घडामोडी होणार की, केवळ पोस्टर युद्ध रंगणार, अशीही चर्चा नागपुरात सुरू झाली. तर अशी पोस्टरबाजी करणे म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे, असे काहींचे मत आहे.