महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल अशी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून, सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सहा नेत्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक उर्फ भाई जगताप, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड व माजी मंत्री असलम शेख यांच्यावर काँग्रेसने सभा नियोजनाची जबाबदारी सोपवली आहे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यात विभागवार वज्रमूठ सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार पहिली सभा छत्रपती संभाजीनगर तर दुसरी सभा नागपुरमध्ये पार पडली आहे. आता तिसरी सभा मुंबईत होत आहे.
वज्रमुठ सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्य व केंद्र सरकारच्या जुलमी, मनमानी, हुकूमशाही सरकारविरोधात आवाज उठवत आहे, असे काँग्रेसने सांगितले आहे. मुंबईतील सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पक्षही जोमाने कामाला लागलेला आहे, असे काँग्रेसने म्हंटले आहे.