शेतकरी,आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. किसान सभेची मुंबईत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतची सह्याद्री अतिथीगृहावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यानंतर पुन्हा लाल वादळ रस्त्यावर उतरणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही किसान सभा अकोले ते लोणी लाँग मार्च काढण्यावर ठाम आहेत. आज (दि.२६) दुपारी हा मोर्चा निघणार आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी या पायी मोर्चाला दुपारी तीन वाजता सुरुवात होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. यात अनेक मान्यवर नेते सहभागी होणार आहेत. यांच्याबरोबर मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज दुपारी या लॉंग मार्च काढला जाणार आहे.
अजित नवले काय म्हणाले?
आमची अकोले ते लोणी या लॉंग मार्चची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रात्रीपासूनच शेतकरी अकोल्यात जमण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अंदाजे तीन हजारांच्या आसपास लोक इथं जमा झाल्याची माहिती अजित नवलें नी दिली. मागील मोर्च्यात एक महिन्याचं आश्वासन दिलं मात्र, अद्यापपर्यंत एकही मागणी पूर्ण केली नसल्याचे नवलेंनी सांगितलं. तसेच आम्ही पत्राद्वारे केलेल्या मागण्यांकडे पूर्णत:दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही नवले यांनी यावेळी केला.
पूर्ण काळजी घेऊनच मोर्चा काढणार
सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र आम्ही आमचा मोर्चा पूर्ण काळजी घेऊन काढणार असल्याचे अजित नवलेंनी सांगितलं. दुपारी तीननंतर मोर्चा काढून रात्री उशिरापर्यंत चालण्याची आमची तयारी आहे. नेते एसीत आणि जनता उन्हात असा प्रकार आमच्या संघटनेत नाही असंही नवले म्हणाले. वाढलेल्या तापमानामुळं कोणाला त्रास झाला तर ती जबाबदारी आमची असल्याचंही नवले यांनी यावेळी सांगितले. मोर्चावर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी किसान सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. थोरात म्हणाले, एखाद्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणं माझ्या मनाला पटत नाही, खरंतर असा मोर्चा प्रांताधिकारी अथवा कलेक्टर कचेरीवर काढायला हवा या मताचा मी आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. मोर्चेकरांच्या प्रश्नासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार balasaheb thorat यांनी स्पष्ट केली आहे.
…तर बेमुदत महामुक्काम आंदोलन
किसान सभेच्या पुढाकाराने राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागी होणार आहे.
हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे