भाजपविरोधात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच दिशेने आम्ही जात आहोत, पण महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लॅन तयार आहे, असं सूचक वक्तव्य आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्त वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चां सुरु झाल्या राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपुर्वी, “आमची महाआघाडी आहेच. एकत्र काम करण्याची इच्छाही आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं.” असं विधान केलं होत. या चर्चांमुळे राजकारण ढवळून निघालं होतं. या घडामोडींबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे
नागपुरमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावरही नाना पटोलेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनता ठरवत असते. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं नाना पटोले म्हणाले.
तसेच, राज्यातील सरकार असंवैधानिक असून सरकारला गांभीर्य नाही. जनतेची तिजोरी लुटणारं हे सरकार आहे. हे सगळं राज्याला लाजवणारं असल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर, खारघरच्या कार्यक्रमात उन्हात तडफडत लोकांनी प्राण गमावले. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.