कोकणात रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. १२ जानेवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बारसूची जागा सुचवली होती. रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात बारसूमध्ये १३ हजार हेक्टर जमीन प्रकल्पासाठी प्रस्तावित केल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला होता.
बारसूत जालियानवाला हत्याकांड होईल – संजय राऊत
Sanjay Raut On Barsu Refinery Survey : बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन करणा-यांना धमकावलं जातंय.. बारसूत पोलीस दडपशाही करत असून तिथे जालियानवाला हत्याकांड होण्याची भीती खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलीय…तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बारसूत घटनास्थळी जावं असं आवाहनही राऊतांनी केलंय..
कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करुन मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि त्यावर मार्ग काढावा. पोलीस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका, अशी आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत सरकारकडे मागणी केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. नवी मुंबईतील खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस बळाचा वापर कराल तर बारसू प्रकरण आपणास महागात पडेल, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्थानिकांचा विरोध असताना बारसू प्रकल्प आणण्याचा कशासाठी घाट घातला जात आहे. यात कोणाचा स्वार्थ आहे. कोणासाठी हा प्रकल्प आणला जात आहे, असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केलेत.
कोकणतील शेतकऱ्यांनी नाणार प्रकल्प हाकलून लावला आहे. आता बारसू प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प आणण्यामागे कोणाचा स्वार्थ आहे. महिला आणि मुलं रस्त्यावर उतरले असताना त्यांच्यावर लाठी हल्ला करण्याचा भ्याड प्रकार कशासाठी? पत्रकारांसमोर कारवाई करणे आवश्यक होते. ज्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प नको. कोणाची तरी सुपारी घेऊन लोकांच्या जमिनी हडप करणे योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देत आहे, हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल, असे राजू शेट्टी म्हणाले.
आज दुसऱ्या दिवशी बारसू – सोलगाव रिफायनरीला (Barsu Refinery Project Protest) स्थानिकांनी तीव्र विरोध केला. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला होता. मात्र यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येने बारसू गावात आले होते. मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा म्हणून सांगितले. मात्र, ते न ऐकल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रत्नागिरीच्या दिशेने घेऊन गेलेत. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, असे म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. माझे सरकारला सांगणे आहे की, लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल, विशेष करुन भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे. तर, तुमचा असा पक्ष वाढणार नाही. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाला मी आव्हान दिलं होतं की हा प्रकल्प तीन ते चार लाख कोटी रुपयांचा प्रकल्प येतोय. लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. तर मग तुम्ही खुलेआम चर्चा घडवा. मी स्वतः तिथे येतो. लोकांना कशा नोकऱ्या देणार हे तुम्ही सांगा, कोकणचे अर्थकारण कसं बदलणार हे तुम्ही सांगा. हिम्मत असेल तर येऊन जाहीर व्यासपीठावर सांगा, मी स्वतः तिथं येतो, असे आव्हान जाधव यांनी सरकारला दिले आहे.
मी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत ऐकलं होत की प्रकल्प लवकर व्हावा म्हणून केंद्र आग्रह करत होते, म्हणून बारसूच्या जागेविषयी पत्र लिहलं होते. बारसूची जागा प्रकल्पाविषयी उद्धव ठाकरे यांनी सूचवली होती. यांचा अर्थ त्यांनी भूमिका बदलली आहे, असं नाही. सरकार तिथे जाऊन सरकार योग्य माहिती देण्याचे धाडस का करत नाही. आमचं अजूनही म्हणणं आहे की लोकांना सोबत घेऊन खुल्या मंचावर चर्चा करावी. जर हा प्रकल्प हिताचा आहे तर लोक का विरोध करतायत याचा विचार सरकारने करायला हवा, असेही भास्कर जाधव म्हणाले.
कोकणात प्रकल्प आले पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मात्र विनाशकारी प्रकल्प नको, कल्याणकारी प्रकल्प हवेत, अशी मनसेनी बारसू प्रकल्पावर आपली भूमिका मांडली आहे. लोकांना विश्वासात घेऊन सरकारने कुठलेही प्रकल्प आणले पाहिजेत. लोकांची मतमतांतर सरकारने समजून घेतली पाहिजेत. शिवसेनेचे खासदार विरोध करतात आणि स्थानिक आमदार पाठिंबा देतात ? शिवसेनेची (ठाकरे गट) नेमकी भूमिका काय? बारसू रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा पद्धतीचे पत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देण्यात आले होते, असा मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे.