• Thu. May 1st, 2025

वक्तव्याने खळबळ अन् महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा; मात्र शरद पवारांची पुन्हा गुगली, आता म्हणाले…

Byjantaadmin

Apr 25, 2023

मुंबई : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप झालेले नसून, त्यामु‌‌ळे विदर्भातील अमरावतीच्या दौऱ्यातील माझ्या त्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये,’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी समाजमाध्यमांवर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत भाष्य केले होते. ‘आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे; पण इच्छा असून चालत नाही. इच्छा पुरेशी नसते, तर जागांचे वाटप महत्त्वाचे असते. मात्र अजून काहीही झाले नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीबद्दल कसे सांगता येईल,’ असे प्रश्न शरद पवार यांनी केले होते.

शरद पवार यांच्या विधानाने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या बातम्यांमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत भाजप आणि शिवसेनेची मंडळी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. अशातच शरद पवार यांच्या त्या विधानाची भर पडली. अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्या भेटीतील तपशीलही उपलब्ध होऊ शकला नाही.

दरम्यान, ‘महाविकास आघाडीचे अद्याप जागा वाटप झाले नाही. पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका,’ असे शरद पवार यांचे स्पष्टीकरण आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते; पण पक्षाचा जनाधार वाढविण्याच्या नावाखाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात उमेदवार दिले असून, त्या उमेदवारासाठी राजकीय अबोला सोडून शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संवाद सुरू केल्याचे काँग्रेसच्या काही जणांचे म्हणणे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *