महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की २०२४ का आत्ताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल. ही मुलाखत देण्याआधी अजित पवार हे भाजपासोबत जातील आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं. तसंच आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. असं असलं तरीही यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आता त्यांच्या सासुरवाडीने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
संत गोरोबाकाकांना कुणी साकडं घातलं?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यातील तेरई या गावाचे गावकरी आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवतात तेरई गावात अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवताच त्यांच्या सासुरवाडीच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हे साकडं घालण्यात आलं आहे. टीव्ही ९ मराठीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.