स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे लातूर बाजार समितीच्या बँक ठेवी दहा कोटीवरून शंभर कोटीच्या करण्यात यशस्वी – माजी सभापती ललितभाई शहा
लातूर प्रतिनिधी – लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या कार्यकाळात बाजार समितीच्या असलेल्या दहा कोटीच्या बँक ठेवी स्वच्छ व पारदर्शक कारभारातून
वाढवून आजघडीला शंभर कोटीच्या बँक ठेवी करण्यात लातूर बाजार समिती यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मत लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललित भाई शहा यांनी व्यक्त केले ते बाजार समिती निवडणूक अनुषंगाने कृषी विकास पॅनेल लातूरच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चिकुर्डा येथे आयोजित प्रचार मेळाव्यात बोलत होते .
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूक २०२३ अनुषंगाने कृषी विकास पॅनेल लातूर उमेदवार प्रचारर्थ रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील चिकुर्डा येथील निर्मलादेवी काळे विद्यालयच्या प्रांगणात जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा, येथील ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, व सोसायटीचे पदाधिकारी यांचा व्यापक मेळावा संपन्न झाला.
यावेळी बोलताना माजी सभापती ललितभाई शहा म्हणाले की, २०१५ मध्ये मी सभापती झालो तेव्हा लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहा कोटीच्या बँके ठेवी होत्या. स्वच्छ व पारदर्शक कारभारातून व्यापारी, शेतकरी,आडते,हमाल,मापाडी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आता या ठेवी शंभर कोटीच्या झाल्या आहेत. हा सर्व पैसा नवीन बाजार समिती विकास करण्यासाठी खर्च केला जाईल. लोकनेते विलासराव देशमुख यांनी दीडशे एकर जागा एमआयडीसी मध्ये लातूर बाजार समितीला दिली आहे.शेतकरी, व्यापारी, ग्रामीण भागातील युवकांना या नवीन बाजारात दुकाने देण्यात येतील. ग्रामीण भागातील मुलींसाठी वस्तीगृह बांधले आहे ज्यात २४० मुलींना निवासाची व्यवस्था होनार आहे. बाजार समितीत आरो प्लांट उभारला, तारण योजना राबवली, मुरुड येथे १००० टनाचे गोडाऊन बांधकाम केले, परिणामी भाजपचे सरकार असताना देखील लातूर बाजार समितीला उत्तम प्रशासनाचा महाराष्ट्रातून पहिला पुरस्कार मिळाला, पाच रुपयात पोटभर जेवण देणारी लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रात पहिली बाजार समिती असून या बाजार समितीला आणखी पुढे नेण्याकरीता आपण सर्व मतदारांनी आपल्या कृषी विकास पॅनेल लातूरच्या नंदीबैल या चिन्हावर शिक्का मारून कृषी विकास पॅनेलला विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मनोज पाटील, रामराम ढगे, धनंजय देशमुख, दिलीपदादा नाडे, स्वयंप्रभाताई पाटील, विजय देशमुख, रवींद्र काळे, बळवंत काळे, बाळासाहेब कदम, गोविंद बोराडे, ज्ञानदेव पाटील, सुरेशराव कदम, अशोकराव काळे, विश्वास कदम, कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, निरीक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यासह काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा जिल्हा परिषद सर्कल मधील मतदार, शेतकरी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.