• Fri. May 2nd, 2025

लातूर-मुंबई दिवाळी स्पेशल रेल्वे सुरू करावी ; रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांचे महाप्रबंधकांना निवेदन 

Byjantaadmin

Oct 13, 2022
लातूर-मुंबई दिवाळी स्पेशल रेल्वे सुरू करावी
 रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांचे महाप्रबंधकांना निवेदन
    लातूर/प्रतिनिधी:सध्या दीपावलीचा कालावधी असून रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.लातूर-मुंबई या गाडीचे वेटिंग तिकीट मिळणेही कठीण झाले आहे.त्यामुळे दीपावलीच्या कालावधीसाठी लातूर ते मुंबई अशी विशेष रेल्वे गाडी सुरू करावी,अशी मागणी रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक झोनल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी महाप्रबंधकांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.
 महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना दिलेल्या निवेदनात निजाम शेख यांनी म्हटले आहे की,लातूरहून मुंबईला जाण्यासाठी एकच गाडी आहे. त्यातही ही गाडी तीन दिवस बिदर  आणि चार दिवस लातूरहून सुटते. मुंबईतील विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.त्यामुळे या गाडीला रोजच गर्दी असते.सध्या दीपावलीचा कालावधी असल्यामुळे ही गर्दी वाढली आहे. रेल्वे तिकिटाचे आरक्षण मिळत नाही.वेटिंगचे तिकीटसुद्धा मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.याचा गैरफायदा घेत खाजगी बस चालकांकडून अधिक तिकीट दर आकारला जात आहे.यामुळे ग्राहकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
     दीपावलीच्या कालावधीसाठी लातूर ते मुंबई अशी विशेष रेल्वे गाडी सोडली तर त्यातून रेल्वे प्रशासनाचा आर्थिक लाभ होऊ शकतो,असे निजाम शेख यांनी म्हटले आहे.
   मुंबईला जाण्यासाठी एकच गाडी असल्याने साहजिकच विविध जिल्ह्यातील मंत्री,
आमदार,लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे व्यक्ती याच गाडीने प्रवास करतात.त्यांना आरक्षित ठेवलेल्या जागा उपलब्ध होतात परंतु त्यामुळे इतर प्रवाशांना वातानुकूलित कक्षाचे तिकीट मिळू शकत नाही.त्यामुळे २२१४४ व २२१०८ या गाड्यांना दोन वातानुकूलित डबे वाढवावेत. दोन स्लीपर कोचही वाढवावेत, अशी मागणी निजाम शेख यांनी या निवेदनात केली आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *