महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसागणिक नवनवीन घडामोडी घडत आहे. तसेच एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघालं होतं. लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भाकितं, तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुढील १५ दिवसांत राज्यात दोन मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान यामुळे राजकीय वातावरण पेटलं असतानाच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना राजकारणात खालावत चाललेल्या पक्षनिष्ठा, फोडाफोडीचं राजकारण, विकास, पक्षबांधणी,भाजपची निर्णय प्रक्रियांवरही रोखठोक मत व्यक्त केलं. मुंडे म्हणाल्या,मला इतके राजकीय भूकंप झाले तर मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं.महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल याचंही टेन्शन येतं. मला या सगळ्याचे काही संकेत असण्याचा काही भाग नाही. कारण राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज आहे का? लोकांची गरज आहे का? या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही असं स्पष्ट मतही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं.
तसेच माझ्या पंधरा वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणावर व्यक्तिगत पातळीवर टीका केलेली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे हे आमच्या हातात नाही. २०२४ च्या निवडणुकीत ते जनता ठरवणार आहे. लोकांचा विश्वास जिंकून भाजपाने निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही तसंच होईल असा विश्वासही पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात मागील काही दिवसात दोघांमध्ये मनोमिलनाच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. एवढंच नाही तर दोन आठवड्यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोनदा एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसून आले. पण आता पुन्हा एकदा जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचारावरुन बहीण-भावामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.
धनंजय मुंडे यांची टीका
धनंजय मुंडे यांनी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. मुंडे म्हणाले, समोरचा पॅनल फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा राहिला आहे. कदाचित एक उमेदवार बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रमच उरकला असता. अनेक जणांनी उमेदवारीच मागे घेतली असती. त्यामुळे काहीच काळजी करु नका, विजय आपला निश्चित असल्याचा दावाही मुंडे यांनी केला होता.
पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेवर पलटवार
पंकजा मुंडे म्हणाल्या, “या निवडणुकीत मी उभी राहिले असून, माझ्यासमोर तेही उभे राहिले आहेत. त्यामुळे जे कोणी उभं राहील, त्यांचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण कॉलेज चालवणं सोपं नाही. त्या ठिकाणी मुलं मुली येतात, त्यांचं भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असते असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उत्तर दिले आहे.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी असा टोलाही मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.