नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवून कॉंग्रेस नेते आमदार सुनील केदार यांनी विजयाची घोडदौड सुरू केली. त्यानंतर अध्यक्ष – उपाध्यक्षपदाची निवडणूक, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर पदवीधर मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघावर विजय मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
गेल्या रविवारी त्यांनी नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे यशस्वी आयोजन करून दाखवले. आता त्यांचा मतदारसंघ असलेल्या सावनेरमध्ये बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी विक्री सोबतच सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारीनंतर सर्व १८ संचालक बिनविरोध निवडून आले. आमदार सुनील केदार यांनी पुन्हा एकदा एक हाती सत्ता राखल्याचे चित्र स्पष्ट झाले
विरोधकांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. बाजार समितीच्या संचालक पदासाठी सेवा सहकारी मतदार संघातून निवडल्या जाणाऱ्या ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी अडते मतदारसंघातून दोन आणि हमाल मतदार संघ एक अशा एकूण १८ संचालक पदाच्या निवडणूक होणार होती. आमदार सुनील केदार यांच्या मर्जीतील १८ उमेदवारांव्यतिरिक्त विरोधात उमेदवारी अर्ज नसल्याने बाजार समितीच्या १८ ही जागेवर आमदार सुनील केदारांनी एक हाती सत्ता राखून सहकार क्षेत्रात पुन्हा आपला दबदबा कायम ठेवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सावनेर बाजार समितीवर आमदार केदार गटाची सत्ता राहिली आहे. यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आमदार केदार गटाने सुरुवातीपासून फिल्डिंग लावली. त्यामुळे विरोधकांना पुढे येण्याची हिंमतच झाली नाही. एवढेच नव्हे तर १८ संचालकापदासाठी कोणत्याही गटाने उमेदवारी अर्ज सादर केला नाही. त्यामुळे केदार गटाची सत्ता अबाधित राहिली. सावनेर तालुक्यातील अनेक संस्थांवर केदार गटाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विरोधक नामोहरम झाल्याची चर्चा आहे.
बिनविरोध निवड झालेल्या बाजार समितीच्या नवनियुक्त संचालक मंडळामध्ये सूरज नवले, मयूर जिचकार, चंद्रशेखर कुंभलकर, देवाजी मुलमुले, सुभाष रहाटे, सुरेश केने, काशीराव पटे, वैभवी पाटील, मनोरमा चोपडे, अशोक डवरे, दुर्वास लाखे, गुणवंत काळे, रवींद्र चिखले, प्रकाश लांजेवार, प्रवीण झाडे, विनोद जैन, जगदीश ठाकरे, श्रावण दुरगवार संचालक पदी अविरोध निवडून आले आहेत.
सावनेरAPMC MLA SUNIL KEDAR यांचीच एकहाती सत्ता असावी, यासाठी येथीलELECTION कार्यक्रम जाहीर होताचZP अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, वैद्यनाथ डोंगरे, शेषराव रहाटे, अरुणा शिंदे, राहुल तिवारी, प्रकाश खापरे, गोविंदराव ठाकरे, प्रकाश पराते, गणेश काकडे, नीलिमा उईके, ममता केसरे, पुष्पा करडमारे, गुणवंता चौधरी आदींनी प्रयत्न केले.