मी भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. ते लोक कसे आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. भाजप हा लोकशाही विरोधातील पक्ष असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोला येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी थेट बोलण्याचे टाळले.
भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याबाबत अकोल्यातील एका कार्यक्रमासाठी आलेले नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे, हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे सांगितले.
भाजपनेही दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पूर्वीसारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमेदवारास पदवीधरांनी पराभूत केले. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
आज शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई मिळत नाहीये. बेरोजगारीमुळे तरुण हैराण आहेत. या सगळ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस प्राधान्याने काम करीत आहे. दुसरीकडे सत्ताधारी याच्या घरात डोकाव, त्याच्या घरात डोकाव, मग घरे फोडा, दुसऱ्या पक्षांचे लोक तोडा, यातच गुंतली असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.
केंद्र सरकारने (Central Government) ED आणि सीबीआय (CBI) हे दोन बंदर पकडून ठेवले आहेत आणि त्यांना हाताशी धरून मदारीचा खेळ चालविला आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.AJIT PAWAR यांच्यासोबत NAGPUR सभेत एकत्र होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून कुठेही ते भाजपकडे चालले असल्याचे जाणवले नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जाणार नाहीत, असा ठाम विश्वास NANA PATOLE यांनी व्यक्त केला.