• Mon. May 5th, 2025

उन्हाळा अधिक तापतोय, आरोग्याची काळजी घ्या …!!

Byjantaadmin

Apr 19, 2023

उन्हाळा अधिक तापतोय, आरोग्याची काळजी घ्या …!!

वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मार्च महिन्यापासुनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पहात आहोत. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 अंश सेल्सशिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान 45 अंशसेल्सशिअस पेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होण्याची शक्यता असते.

अति जोखमीचे घटक, उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक,वृध्द व्यक्ती व लहान मुले, गरोदर महिला, स्थूल व्यक्ती व पुरेशी झोप न झालेले व्यक्ती, मधुमेह, ऱ्हदयविकार, दारुचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रीत, घरदार नसलेले गरीब लोक, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंध येणाऱ्यांना उष्माघाताचा धोका असतो. अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा असतो.

उष्माघातातील लक्षणे:- थकवा येणे, ताप येणे, शरिरावर व्रण उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्द अवस्था व मृत्यूही होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपायः- असे करा:- पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे (पांढरे) सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, टोपी व पादत्राणे वापरा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्य असल्यास उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रिन क्रिम वापरा किंवा कोरपफडीचा गर लावा. शरबत किंवा जलसंजीवनीचा वापर करा.

उन्हाळयात हे करु नये:- कष्टाची कामे उन्हात करु नका. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरु नका. मद्यपान, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक टाळा. खुप प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

असे करा प्रथमोपचार:- रुग्णास वातानुकूलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे कुलर ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. आईसपॅक लावावेत. रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे.

-जिल्हा माहिती कार्यालय,लातूर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *