पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत अस्थिरोग शिबिरात २५६ रुग्णांची तपासणी
लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने गुरुवार, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात एकूण २५६ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती पोद्दार हॉस्पिटलचे संचालक , ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेले यावर्षीचे हे १५७ वे मोफत आरोग्य शिबीर होते. यावेळी पोद्दार हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ जनजागृती शिबीरही घेण्यात आले.
पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिरांची मूळ संकल्पनाच डॉ. अशोक पोद्दार यांच्या पुढाकारातून सुरु झाली आहे, हे विशेष. या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलनाने शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, डॉ. चेतन सारडा, डॉ. राजेश दरडे, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. विश्रांत भारती , रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अमोल दाडगे , सचिव पवन मालपाणी, प्रोजेक्ट चेअरमन श्रद्धानंद आपशेट्टी, अमोल बनाळे , पस्तापुरे , माजी उपमहापौर कैलास कांबळे, मंगेश कुलकर्णी, विजय रांदड, जयेश बजाज आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पोद्दार हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या अस्थिरोग शिबिरात एकूण २५६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये २२५ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची मोफत तपासणी करण्यात आली. ६३ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. ३२ रुग्णांची रक्त तपासणी तर १८० रुग्णांची फिजिओथेरपी करण्यात आली. शिबिरात सहभाग नोंदविलेल्या सर्वच्या सर्व रुग्णांना विविध नामांकित औषध कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी मोफत औषधी उपलब्ध करून दिली. या शिबिरात अस्थिरोग, फिजिओथेरपी मोफत करण्यात आली तर रक्त तपासणी, शस्त्रक्रिया शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली. हेल्थ इन्शुरन्स जनजागृती शिबिराच्या आयोजनातसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड, रोटरी कल्लभ ऑफ लातूर मिडटावून व पोद्दार हॉस्पिटल परिवाराने पुढाकार घेतला होता. रुग्णांना यावेळी हेल्थ इन्सुरन्सचे महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नसेवा उपक्रमही पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते पाटील, उप अधिष्ठाता डॉ. उमेश कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आदी मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत ही अन्नसेवा करण्यात आली.
पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत अस्थिरोग शिबिरास माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख, खासदार डॉ .शिवाजी काळगे यांनीही सदिच्छा भेट दिली. त्यावेळी डॉ.अशोक पोद्दार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना धिरज देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करून डॉ. पोद्दार यांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही या अभिनव उपक्रमाबद्दल डॉ. पोद्दार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. दिवंगत लोकनेत्याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लातुरात २०० पेक्षाही अधिक हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या मोफत आरोग्य शिबिरांचे समन्वयक म्हणून डॉ. अशोक पोद्दार यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडल्याबद्दलही धिरज देशमुख, खासदार डॉ. काळगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या शिबीर प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी स्वागत केले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती आणि पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून नियमितपणे अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जाते. डॉ.अशोक पोद्दार हे आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातही कायम कार्यरत असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम डॉ. अशोक पोद्दार आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने करत असतात. डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी बोलताना अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व तपासणी शिबिरांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रुग्णांची सेवा करण्याची संधी आपणास मिळते, असे सांगितले. भविष्यातही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचे देणे लागतो. अशा प्रकारच्या शिबीराच्या माध्यमातून आपण समाज ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या उन्नतीसाठी भरीव योगदान राहिले आहे. या क्षेत्रातील अद्यावत उपचार यंत्रणा, अद्यावत मशिनरी लातूरमध्येही रुग्णसेवेसाठी उपलब्ध असली पाहिजे, या भावनेने त्यांनी सर्व तज्ज्ञ डॉक्टर मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केल्याची भावना डॉ. पोद्दार यांनी बोलून दाखविली. प्रतिवर्षाप्रमाणे यावेळीही शिबिरादरम्यान दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या भाषणांच्या चित्रफिती उपस्थितांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या शिबीरात डॉ. अशोक पोद्दार यांच्यासह पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे डॉ. पार्थ शहा, डॉ.इमरान कुरेशी, डॉ. प्रितम , डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. मुंडकर, डॉ. श्रुती, डॉ.साक्षी सारडा, डॉ. निकिता ब्रिजवासी यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी वसीम शेख यांसह हॉास्पिटलचे सर्व कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेंटिटीव्ह यांनी परिश्रम घेतले.
