महाराष्ट्र सरकारने रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“केंद्रीय गृहमंत्री AMIT SHAH मतांचं राजकारण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण असलो पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला होता. मात्र, त्यानंतर मृतकांच्या घरी किंवा रुग्णालयात त्यांनी जावं, त्यांची विचारपूस करावी, एवढी मानवतादेखील त्यांनी दाखवली नाही”, अशी टीका SUSHMA ANDHARE यांनी केली.
“अध्यात्माचं राजकारण करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न”
“राजकारणाचं अध्यात्मिकरण झालं पाहिजे, ते अध्यात्माच्या पातळीवर गेलं पाहिजे. या लोकांनी आप्पासाहेबांकडून ते शिकलं पाहिजे. मात्र राजकारणाचं अध्यात्मिकरण करण्यापेक्षा अध्यात्माचं राजकारण कसं करता येईल, यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न सुरु आहेत”, असेही त्या म्हणाल्या.