कर्नाटकात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाला पक्षफुटीचे ग्रहण लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यापाठोपाठ कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही काँग्रेसची साथ धरली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक भाजपा अध्यक्ष अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, सिद्दरामया यांच्या उपस्थितीत आज बंगळुरूत पक्षप्रवेश झाला. वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कर्नाटकात निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांनी उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या. गेल्या आठवड्यात भाजपाकडूनही उमेदवारांच्या नावांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या. पहिल्या यादीत नाव न आल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी नाराज होऊन भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यापाठोपाठ जाहीर झालेल्या याद्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचं नाव न आल्याने त्यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता त्यांनीही काँग्रेसला साथ देण्याचं ठरवलं आहे. आज बंगळुरूत त्यांचा जाहीररित्या पक्षप्रवेश झाला.
गेल्या सहा टर्मपासून हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेले जगदीश शेट्टर यांना आगामी निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली नाही. त्यामुळे नाराज शेट्टर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चाही केली होती. परंतु, ही चर्चा अपयशी ठरल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
“मी मनापासून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.congress नेते डी. के. शिवकुमार, सिद्दरामया, रणदीप सुरजेवाला आणि एम. बी. पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी कोणताही विचार न करता येथे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी जगदीश शेट्टर यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
“जगदीश शेट्टर यांनी कोणतीही मागणी केलेली नाही. आम्ही त्यांना कोणतेही ऑफर दिलेले नाही. पक्षाचा आणि पक्षनेतृत्त्वाचा आदेश त्यांना पाळावा लागेल. आम्हाला देशाला एकसंध ठेवायचं आहे आणि काँग्रेसच असं करू शकेल”, अशी प्रतिक्रिया कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवाकुमार यांनी दिली.
“मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा विचार केला आहे. मी मनावर दगड ठेवून पक्षाचा राजीनामा देत आहे. मी तोच आहे ज्याने पक्ष तयार केला आणि उभा केला आहे. पण पक्षातील काही नेत्यांनी मला पक्षाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे”, अशी प्रतिक्रिया जगदीश शेट्टर यांनी उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिली होती.
पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जगदशी शेट्टर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडींना मी वैतागलो आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिला असून पुढची दिशा ठरवण्याकरता माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. तुमचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर नेहमीप्रमाणेच असेल.”
कोण आहेत जगदीश शेट्टर?
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी तालुक्यातील केरुर या गावी १९५५ रोजी जन्मलेल्या शेट्टर यांनी २०१२ ते २०१३ पर्यंत कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सहा वेळा आमदार असलेले शेट्टर लिंगायत समाजातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१८ या काळात शेट्टर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. तसेच २००८-०९ या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले. बीएस येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शेट्टर यांनी विविध मंत्रिपदे भोगली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक-राजकीय कार्याला सुरूवात केली होती.
I am wholeheartedly joining Congress. I was contacted by Congress leaders including DK Shivakumar, Siddaramaiah, Randeep Surjewala and MB Patil. When they invited me, I came without any second thought: Jagadish Shettar after joining Congress pic.twitter.com/A20uhPRVUH
— ANI (@ANI) April 17, 2023