उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, आता दोघांचाही शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी अतिकच्या शरीरातून नऊ गोळ्या काढल्या. अतिकला डोक्यात एक, छातीत एक आणि पाठीत सात अशा एकूण नऊ गोळ्या मारण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्याचा भाऊ अशरफच्या शरीरातूनही पाच गोळ्या काढण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे.
रविवारी रात्री अतिक आणि अशरफवर अंत्यसंस्कार
दरम्यान, काल रात्री प्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अतिक आणि अशरफ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शनिवारी सकाळी अतिकचा मुलगा असदलाही याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते.
तीन आरोपींना अटक, १४ दिवसांंची न्यायालयीन कोठडी
याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. लवलेश तिवारी, मोहित सनी, आणि अरुण मोर्य अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांविरोधात भादंविच्या कलम ३०२ आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिघांनीही गुन्हा कबुल केला असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं पुढे आलं आहे.