मुंबई : ”भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल… असे ट्विट bjp अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले होते. पण या पोस्टनंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनीही भाजपला धारेवर धरलं आहे.तर भाजपच्या गोटातही अस्वस्थताही निर्माण झाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ”भाजपचा असा कोणताही अजेंडा नाही. पण असं ट्विट कुणी आणि का केलं? याचा तपास सुरु आहे.असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की जाणूनबूजून केली गेली? याबाबतही चौकशी केली जाईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदुराष्ट्र… ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी, हिंदुराष्ट्र म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश, अशी त्याची व्याख्या केली. यासोबत भाजपच्या इतर नेत्यांनीही हिंदुराष्ट्र हीच आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
तर दुसरीकडे, भाजपच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या या ट्विटवरुन विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अनेकदा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सार्वजनिक मंचावरून हिंदू राष्ट्राच्या मागणीची अनेक वक्तव्येही केली होती. आता महाराष्ट्रातही हिंदू राष्ट्राचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
भाजपाच्या या ट्विटनंतर महाराष्ट्र congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.”जे लोक देशाच्या संविधानाला मानत नाहीत. त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करावी, भारताचं एक स्वतंत्र संविधान आहे. संविधान आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. संविधान नसतं तर ते उपमुख्यमंत्री झाले नसते, अशी खरमरीत टीका नाना पटोल यांनी केली आहे.