• Sat. May 3rd, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Byjantaadmin

Apr 15, 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लातूर, (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या या कर्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

समाज कल्याण विभागामार्फत विविध उपक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  • व्याख्यान, भीम गीत गायनातून विचारांचा जागर
  • विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

लातूर,  (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे व्याख्यान, भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

व्याख्याते डॉ. हनुमंत पवार, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील वित्त व लेखा सहायक संचालक श्री. डाके, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, लेखाधिकारी मनोज सकट, सेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रमोद जेटीथोर, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागाचे डॉ. संजय गवई यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या कल्याणासाठी मांडलेल्या विचारानुसार आज समाज कल्याण विभाग कार्यरत आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवून त्यांचा विकास करण्यावर या विभागाचा भर आहे. यासाठी 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर करण्यात येत असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनुसूचित जाती, तृतीयपंथी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, कृषि, जलनीती, वीज धोरण, कामगार, स्त्रियांचे प्रश्न यासारख्या विविध विषयांचा अभ्यास करून त्यावर आपले विचार मांडले. त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी या महामानवाचे विचार प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांची विविध भाषणे आदी साहित्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत. त्यांच्या विचारांची शिदोरी घेवून, त्यांच्या विचारांचे पाईक बनून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास करू शकतो, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. हनुमंत पवार यांनी यावेळी केले.

समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध लेखन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, पोस्टर पेंटिंग, एकपात्री नाटिका, भीम गीत गायन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

झी युवा सिंगर पुरस्कारप्राप्त प्रतिज्ञा गायकवाड आणि सुनिता गायकवाड यांच्या चमूने तसेच एमआयडीसी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध भीम गीते सादर केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गीतांमधून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *