• Sat. May 3rd, 2025

सहा वर्षांचा चिमुकला ते पंचविशीतील तरुण; बोरघाटातील अपघाताने १३ उमदे वादक गमावले

Byjantaadmin

Apr 15, 2023

रायगड/खोपोली : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांना प्राण गमवावे लागले. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोरेगावचे बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमाला गेले होते. तिथून मुंबईला परत येत असताना काळाने घाला घातला. पथकातील दोघे जण खोपोलीला राहत होते. त्यांना सोडण्यासाठी बसने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डावीकडे वळण घेतले. बोरघाटात झालेल्या अपघात १३ जणांनी प्राण गमावले, तर खोपोलीत राहणारे ते दोघेही जण सुरक्षित आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सकाळपासून कामोठे येथील MGM रुग्णालय येथे थांबून होते. जखमी रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही उदय सामंत यांनी दिले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.

अपघातातील मृतांची नावे

जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई
यश सुभाष यादव
कुमार वीर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष

कुमारी वैभवी साबळे, वय १५ वर्ष
स्वप्नील धुमाळ, वय १६ वर्ष
सतिश धुमाळ, वय २५ वर्ष
मनीष राठोड, वय २५ वर्ष

कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई
राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई

अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. बसचे टप उचकटले गेले, तर सीट्सही बाहेर आल्यात. तर छतावर ठेवलेले ढोल-ताशेही विखुरले होते. अपघातानंतर गंभीर जखमींना पोलिसांनी खांद्यावरुन वर नेलं. मला आधी वर न्या, माझा जीव वाचवा, अशी याचना जखमी मुलं करत होती. काही जण पिण्यासाठी पाणी मागत होती, परंतु त्यांना गंभीर जखमा झाल्याने तातडीने पाणी देणं टाळण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *