• Fri. May 2nd, 2025

काळजी घ्या, सूर्य आग ओकतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

Byjantaadmin

Apr 13, 2023

राज्यात सध्या उन्हाळा वाढला असून नागरिकांना उन्हाचे चटके बसतायत. बुधवारी शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदवलं गेलं. तर सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात प्रचंड उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच वाढत्या पाऱ्यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. हिंगोलीत उष्माघाताने एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झालाय.

पाच वर्षाच्या मुलीच्या उष्माघाताने मृत्यू

मार्च महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला दिसला. यावेळी या वाढत्या पाऱ्याने कण्हेरगाव नाका इथल्या नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. या मुलीला अचानक ताप आणि उलटी जुलाब सुरु झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र तीव्र ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिला उष्माघात झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे.

यावेळी डॉ. योगेश दळवी यांनी झी 24 तासला बोलताना माहिती दिली की, लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना रखरखत्या उन्हापासून लांब ठेवलं पाहिजे. जर घराबाहेर पडणं गरजेचं असेल तर उन्हाचा मुलांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. या काळामध्ये मुलांना भरपूर पाणी प्यायला द्यावं, जेणेकरून डिहायड्रेशनची समस्या त्यांना सतावणार नाही. यावेळी लिंबूपाणी आणि ओआरएसचं पाणी देखील तुम्ही देऊ शकता.

डॉ. दळवी पुढे म्हणाले की, जर बाहेरून आल्यानंतर मुलाला उन्हाचा त्रास झाल्याचं जाणवलं तर, त्याचं अंग साध्या पाण्याच्या टॉवेलाने पुसुन घ्यावं. यावेळ पोटात मळमळ, उलट्या, ताप तसंच त्वचा एकदम कोरडी पडणं, अशी लक्षणं दिसून येऊ शतकतात.

उष्माघातापासून कशी घ्याल लहान मुलांची काळजी

  • जर मुलाला बाहेर शाळेत पाठवत असाल तर त्याच्यासोबत पाण्याची बाटली जरूर द्यावी
  • रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी टोपी घालण्यास द्यावी
  • मुलांच्या शरीरात पाणी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावं. यावेळी ताज्या फळांचा रस किंवा लिंबूपाणी प्यायला दिलं पाहिजे.
  • सुती कपडे घालण्यास प्राधान्य द्यावं
  • मुलांना घरातील पदार्थ खाण्यास द्यावेत
  • हलका जरी ताप आला तरी मुलांना डॉक्टरांकडे न्यावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *