• Fri. May 2nd, 2025

अर्थशास्त्राचा पेपर देऊन नववधू थेट विवाह मंडपात, कल्याण जवळील जीवनदीप महाविद्यालयातील घटना

Byjantaadmin

Apr 13, 2023

कल्याण : एकाच दिवशी मुंबई विद्यापीठाची सहाव्या सत्राची परीक्षा आणि त्याच दिवशी लग्नाची तारीख. त्यामुळे विवाह सोहळयाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असताना, कल्याण तालुक्यातील वरप गावातील नववधू असलेल्या एका विद्यार्थीनीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता तीन तासाचा अर्थशास्त्राचा पेपर दिला. ती त्यानंतर थेट विवाह मंडपात विवाहासाठी हजर झाली.

Kalyan, bride , Examination, economics paper, marriage hall

कल्याण जवळील वरप गावातील अश्विनी अभिमन्यू म्हसकर ही गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयातील अर्थशास्त्राची अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी. काही महिन्यापूर्वीच अश्विनीचा विवाह आणि तारीख कुटुंबीयांनी वराबरोबर निश्चित केली होती. परंतु, विवाह सोहळा निश्चित झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यात अश्विनीच्या अर्थशास्त्र पेपरची तारीख आणि विवाह सोहळ्याची तारीख (१३ एप्रिल) एकच आली. त्यामुळे आता विवाह सोहळ्याचे करायचे काय, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता. अश्विनीने विवाह सोहळा ठरल्या दिवशीच आणि त्या वेळेतच होईल. पण मी पहिले जीवनदीप महाविद्यालयात गुरुवारी जाऊन माझा अर्थशास्त्राचा सकाळचा साडे दहा वाजताचा पेपर देईन. तीन तासाचा पेपर झाला की विवाह मंडपात हजर होईन, असे कुुटुंबीयांना सांगितले. नातेवाईक, सासरच्या मंडळींनी तिच्या या भूमिकेचे स्वागत केले.विवाह सोहळ्यानिमित्त घर पाहुण्यांनी घर भरलेले. त्यात परीक्षेचा अभ्यास, थोडासा तणाव. सर्वत्र आनंदी वातावरण अशा वातावरणातून अश्विनी म्हसकर गुरुवारी सकाळी हातात नवचूडा, उटणे, हळदीचा दरवळ अशा नववधूच्या पेहरावात अर्थशास्त्राच्या पेपरसाठी जीवनदीप महाविद्यालयात हजर झाली. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पेपर सोडविल्यानंतर ती विवाह सोहळ्यासाठी घरी दाखल झाली. महाविद्यालय ते घर यासाठी तिच्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.

विवाह जीवनातील एक महत्वाचा क्षण, तरी त्या क्षणातून काही वेळ बाजुला येऊन आपले विहित कर्तव्य पार पाडण्यासाठी महाविद्यालयात पेपरसाठी ती आली. जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य डाॅ. के. बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रांनी अश्विनीचे कौतुक करुन तिला पहिलेे परीक्षा आणि त्यानंतर विवाहासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *