जयक्रांती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 18 तास वाचन उपक्रम
लातूर : येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयातील सभागृहामध्ये सलग 18 तास वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, संशोधक तसेच समाजातील इच्छुक व्यक्तींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल तसेच सध्याच्या काळामध्ये वाचन संस्कृती लोप होत चालली असून समाजातील सर्व स्तरातून वाचन वाढविणे अतिशय आवश्यक आहे, त्यासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयातील वेगवेगळे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपण स्वतः ही ग्रंथ आणून या उपक्रमात सहभागी होऊ शकता, तसेच महाविद्यालयात उपलब्ध असलेले ग्रंथ सुद्धा वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, ग्रंथपाल प्रा. रिता कदम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव अलगुले, कला विभागाचे समन्वयक डॉ. राजेश्वर खाकरे, डॉ. राजाभाऊ पवार, डॉ. अविनाश पवार यांनी केले आहे.