महाराष्ट्र महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांनी आपली विचार व कृतीच्या माध्यमातून तत्कालीन समाज व धर्मव्यवस्थेत मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले होते. त्यांच्या शिक्षणविषयक कार्यामुळेच परिवर्तनाची लाट महाराष्ट्रात उभी राहिली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी स्वीकारलेली सत्यनिष्ठा ही याठिकाणच्या प्रथा परंपरांच्या माध्यामतून टिकून असलेली प्रतिगामी व्यवस्था उलथून टाकण्यास कारणीभूत ठरली. महात्मा फुलेंच्या विचारांमुळे महाराष्ट्राने ख-या अर्थाने आधुनिकतेची सुरुवात झाली. त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होणारे विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरतात.
या महान युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर श्री उमाजी तोरकड, श्री दिलीप सोनकांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले.