गुप्तांगातून पोटात शिरला साप! वेदनेनं विव्हळत तरुण रुग्णालयात
रात्री सव्वा आठच्या सुमारास कोतवाली परिसरातील बनियानी पुरवा गावात राहणाऱ्या महेंद्रला (२५ वर्षे) घेऊन कुटुंबीय हरदोईतील वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन विभागात पोहोचले. तरुण उघड्यावर शौचाला गेला असताना तिथे त्याला काळ्या रंगाचा साप चावला. त्यानंतर तो विषारी साप गुप्तांगाच्या वाटेनं पोटात घुसला, असं कुटुंबीयांनी सांगितलं. पोटदुखीनं मेटाकुटीला आलेल्या तरुणानंदेखील हाच घटनाक्रम सांगितला. डॉक्टरांनी त्याच्या सर्व अवयवांची तपासणी केली. मात्र त्यांना कुठेच सर्पदंशाच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यांनी महेंद्रला वेदनाशामक गोळ्या दिल्या.
वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. शेर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेला तरुण अमली पदार्थांच्या नशेखाली होता. नशेत असल्यावर कधीकधी त्याच्या पोटात दुखू लागतं. रुग्णालयात आला त्यावेळी तो नशेत होता. त्यानं नशेच्या अमलाखाली असतानाच कुटुंबीयांना सापाबद्दल सांगितलं. घाबरलेले कुटुंबीय त्याला घेऊन रुग्णालयात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं. त्याचा रिपोर्ट चांगला आहे. यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन गेले.