• Fri. May 2nd, 2025

धनुभाऊ म्हणाले, ‘पंकजाताई जर भगवान गडाची पायरी तर मी त्या पायरीचा दगड’; मुंडे बहीण भावाचं मनोमिलन झालं?

Byjantaadmin

Apr 11, 2023

अहमदनगर : बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी आज मराठवाड्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची घटना घडली. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले बहीण-भाऊ एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र आले. भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री तेथे होतेच. मधल्या काळात विविध कारणांमुळे चर्चेत असलेले हे तिघे असे एकत्र आल्याने राजकीय शेरेबाजी रंगली. अर्थात त्यातून आव्हाने-प्रतिआव्हानेही देण्यात आलीच. यामुळे त्यांच्यातील दुरावा दूर होणार असल्याची चर्चा सुरू झालीये.

बीड जिल्ह्याच्या सीमेवर आणि भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भाजर्डी गावात नारळी सप्ताह सुरू आहे. या भागातील हा मोठा आणि महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असतो. त्यामुळे याची निमंत्रणे गडाशी संबंधित आणि सर्वच भक्तांना जातात. यावेळी झाले असे की निमंत्रण मिळालेल्या सर्वच व्यक्ती आवूर्जून आल्या. त्यात मुंडे बहीण भावांचा समावेश होता. सुरवातीला पंकजा आल्या. त्यांची वाजगाजत मिरवणूक काढून त्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. त्या पोहोचतात ना पोहोचतात तोच धनंजय मुंडे आले.

मुंडे बहीण भावांत जसा राजकीय वाद आहे, तसाच वाद गडाचे महंत नामदेवशास्त्र आणि पंकजा यांच्यात सुमारे सात वर्षांपूर्वी झालेला आहे. गडावर राजकीय मेळावा घेण्यावरून हा वाद झाला होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर टीका केली होती. कार्यकर्तेही आपसांत भिडले होते. गडावर दसरा मेळावा घेण्याची पद्दत नामदेव शास्त्री यांच्या नियमामुळे बंद झाली. नंतर मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी सावरगाव येथे मेळावा घेण्याची पद्धत सुरू केली. पुढे गोपीनाथ गडाची निर्मिती झाली. मधल्या काळात पंकजा आणि नामदेव शास्त्री यांच्यातील दुरावा कायम राहिला.

आज ही मंडळी पुन्हा एकत्र आली. त्यामुळे नामदेव शास्त्री यांनीही यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी राजकारणी नाही, राजकारण करीतही नाही. मला भगवानबाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी धडपड सुरू आहे. लोक कष्टाचे पैसे आणून देत आत. धनंजय यांनीही मोठी मदत केली. पंकजासोबत माझे कोणतेही वैर नाही. फक्त एवढेच सांगायचे आहे की सर्वांनी साधू संतांचा आदर ठेवावा. दोघेही मुंडे घराण्याचे सदस्य आहात, पाठीमागे टीका केली जाऊ नये,’ असा सल्लाही नामदेव शास्त्री यांनी दिला.

त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘माझ्याबद्दल तुम्हाला कोणी तरी वेगळे काही सांगितल्याचे दिसते. माझ्या बोलण्याची पद्धत तशी आहे. कोणाला तो अहंकार वाटू शकतो. आम्ही एकत्र येऊ नये, अशीच अनेकांची अपेक्षा आहे. मात्र, आपल्याला भगवानबाबांबद्दल नितांत श्रद्धा आहे. गडाबद्दल कधीही वाईट बोलू शकत नाही. आम्हाला तुम्ही शिव्या दिल्या तरीही ती फुले म्हणून आम्ही डोक्यावर घेऊ. धनंजय आणि माझ्यात काही वाद नाहीत. महाराज आणि माझ्यातही वैर नाही’ असेही मुंडे म्हणाल्या.धनंजय मुंडे यांनीही आपल्यात वाद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘भगवान बाबांचा भक्त हीच आपली खरी ओळख आहे. राजकारणात आम्ही कितीही दूर असलो तरी येथे ताई माझ्याजवळ आहे. पूर्वी एकदा पंकजा म्हणाल्या होत्या, मी भगवान गडाची पायरी आहे. असे असेल तर मी त्या पायरीचा दगड आहे. मी लहान आहे. माझ्या सभा मोठ्या होत नाहीत. पंकजा ताईंच्या सभा मोठ्या होतात. भगवान गडासाठी जे काही करता येईल, ते आम्ही दोघे नक्की करू’, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *