सोलापूर : तेलंगणाचे भारत राष्ट्र समितीचे आमदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे विश्वासू एन. रामलू हे सोमवारपासून सोलापूर शहरात तळ ठोकून आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादूल हे भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल झाले आहेत. सादूल यांच्या मदतीने राव यांचे निकटवर्तीय आमदार आणखी किती जणांना गळाला लावतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान, चंद्रशेख राव यांच्या पक्षाने आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते फोडले आहेत. सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा एकही नेता बीआरएसच्या गळालेला लागलेला नाही. त्यामुळे बीआरएसची खरी भिती ही महाविकास आघाडीतील पक्षालाच आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मोठी धास्ती आहे.
बीआरसीच्या सोलापुरातील पक्षवाढीच्या कार्याची पायाभरणीसाठी सातत्याने पक्षाचे पदाधिकारी माजी खासदार धर्माण्णा सादूल यांच्याशी संपर्कात आहेत. मागील आठवड्यात सादूल यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केल्यानंतर पक्षाकडून पुढील तयारीबाबत उत्सुकता लागली होती. सादूल यांनी बीआरसीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्याशी संवाद साधून पुढील कार्यक्रमाबाबत चर्चा केली होती.
त्या चर्चेनंतर एन. रामलू हे सोलापुरात दाखल झाले आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरवात केली आहे. माजी खासदार धर्माण्णा सादूल, गणेश पेनगोंडा यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (ता. १० एप्रिल) आ. रामलू यांनी शहरातील नागरिकांशी संवाद सुरु केला. तेलगु भाषिकांसोबत अनेक आजी-माजी नगरसेवक, ज्ञाती संघटनांचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिकांनी रामलू यांची भेट घेऊन चर्चा केली.
सोमवारी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आ. रामलू हे आज (ता. ११ एप्रिल) पुन्हा अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दौऱ्याचा अहवाल सादर करणार आहेत.