• Thu. May 1st, 2025

मुंडे विरुद्ध मुंडे लढत झाली तरच MVA ला विजयाची संधी…

Byjantaadmin

Apr 9, 2023

राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जाते. दोन महिन्यापुर्वी झालेल्या विधान परिषद आणि नुकत्याच झालेल्या कबवा, चिचंवड पोटनिवडणुकीच्या निकालाने तसा कल दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे महाविकास आघाडीला विजयाची संधी मिळू शकते, पण त्यासाठी मुंडे विरुद्ध मुंडे अशी लढत होणे अपेक्षित आहे. इतर कुठलाही उमेदवार भाजपसमोर टीकाव धरू शकणार नाही अशी परिस्थिती आहे.

भाजपच्या विद्यमान  mp pritam munde यांच्याबद्दल नाराजी असली तरी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग त्यांना पराभूत करून ती व्यक्त करण्याची शक्यता कमीच आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे या तब्बल सात लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. यावरून beed लोकसभा मतदारसंघात मुंडे यांना मानणारा मतदार किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून आले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या सहानुभूतीची लाट ओसरली असली तरी प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा १ लाख ६८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. दरम्यान, मुंडे यांच्या दुसऱ्या भगिनी आणि गोपनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या पकंजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून आपले चुलत बंधु राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडूनच पराभूत झाल्या.

यामुळे भाजपला म्हणण्यापेक्षा वैयक्तिक पंकजा यांना धक्का बसला. परळीतील या पराभवामुळे जिल्ह्यातील राजकारण बदलले. पंकजा यांनी आपल्या पराभवाला भाजपमधीलच नेते जबाबदार असल्याचा आरोप करत पक्षाची नाराजी ओढावून घेतली. पंकजा यांच्या या स्पष्टवक्तेपणाचे नुकसान त्यांना अजून सोसावे लागत आहे. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना परळी या मतदारसंघासह जिल्ह्यात देखील आपली बाजू भक्कम करुन घेतली.

तर दुसरीकडे नाराज पंकजा आणि त्यांच्या खासदार भगिनी प्रितम मुंडे यांचा मात्र जिल्ह्याशी असलेला संपर्क कमी होत गेला. राज्यातील नेत्यांशी बिघडलेले संबंध, दिल्लीत मान असल्याचे चित्र जरी रंगवले जात असले तरी खरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक भाजपवर मात करू शकतात. पण त्यासाठी मुंडे विरुद्ध मुंडे अशी लढत अपेक्षित आहे.

भाजपकडून लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी देखील चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. मध्यप्रदेशच्या प्रभारी म्हणून त्या काम पाहतात. राज्यापेक्षा त्यांची दिल्लीतील नेत्यांमध्ये उठबैस वाढली आहे. मी राज्याची नाही, तर देशपातळीवरची नेता आहे, माझे नेते देखील दिल्लीतच असतात असे पंकजा नेहमी सांगतात.

त्यामुळे पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि प्रीतम मुंडेंना मतदारसंघात फारसा प्रतिसाद मिळणार नाही हे लक्षात घेवून दिल्लीतून प्रीतम ऐवजी पंकजा असा बदल केला जावू शकतो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री शिवाजीरावर पंडीत यांचे संबंध पाहता अमरसिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता आहे.

अमरसिंह भाजपला चांगली लढत देवू शकतील याबद्दल शंका नाही, परंतु विजयाला गवसणी घालणे त्यांना शक्य होणार नाही, असे बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी देतांना धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील विचार केला जावू शकतो. त्यांची इच्छा नसली तरी पक्षाने आदेश दिला तर तो त्यांना मानावा लागेल. असे झाले तर परळी विधानसभेच्या विजयाची पुनरावृत्ती बीड लोकसभा मतदारसंघात पहायला मिळू शकते.

आज घडीला बीड लोकसभा मतदासंघातील विधानसभेच्या सहापैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे तर दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. याचा फायदा देखील राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. बीड लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी लढली तरी ही निवडणुक त्यांना एकट्याच्याच ताकदीवर पेलावी लागणार आहे. शिवसेना आणि काॅंग्रेसचा जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *