• Wed. Apr 30th, 2025

बीपीची गोळी समजून उंदिर मारण्याचं औषध खाल्लं; रुग्णालयात दाखल करेपर्यंत …

Byjantaadmin

Apr 8, 2023

परभणी : बीपीच्या नियमित गोळ्या घेणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेनं नजर चुकीने उंदीर मारायची गोळी खाल्ल्यामुळे सदरील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावामध्ये घडली आहे. प्रियंका संतोष टेकाळे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या विचित्र घटनेमुळे वालूर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची सेलू पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
parbhani a woman died after taking rat poison by mistake
परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर येथे राहणाऱ्या प्रियंका संतोष टेकाळे या महिलेला बीपीचा आजार होता. त्यामुळे त्या नियमितपणे बीपीच्या गोळ्या खात होत्या. मात्र ४ एप्रिलला प्रियंका यांनी बीपीची गोळी समजून उंदीर मारण्याची विषारी गोळी खाल्ली त्यामुळे काही वेळानंतर प्रियंका यांना उलटी होऊन त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये उपचारासाठी दाखल केलं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रियंका यांच्या नातेवाईकांना त्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती दिली.

विषबाधा झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रियंका यांना उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, महिलेची प्रकृती अधिकच बिघडत असल्यामुळे महिलेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना छत्रपती संभाजी नगरला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, छत्रपती संभाजी नगरला घेऊन जात असताना वाटेमध्येच प्रियंका टेकाळे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अनिल टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी अशोक हिंगे करत आहेत. नजर चुकीने महिलेने उच्च रक्तदाबाची गोळी समजून उंदीर मारण्याची गोळी खाल्ल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *