काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला हात घातला आहे. ‘ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात, असे ते एका ट्विटमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अदानींच्या कंपन्यांतील 20 हजार कोटींची बेनामी रक्कम कुणाची आहे?’, असा सवालही केला.
राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या 5 माजी नेत्यांचाही अदानींशी संबंध जोडला. त्यांनी यासंबंधी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. त्यांनी अदानीतील (ADANI) ‘A’ शब्दाचा संबंध गुलाम (नबी आझाद) यांच्याशी, B चा शिंदे (ज्योतिरादित्य) यांच्याशी, ‘A’ चा किरण (रेड्डी), ‘N’ चा हिमंता (बिस्वा सरमा) व ‘I’ चा संबंध अनिल (अँटोनी) यांच्याशी जोडला. ते म्हणाले – ‘मी भारताच्या आवाजासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी माझी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे.’
अदानी मुद्यावर शरद पवारांची वेगळी भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अदानी प्रकरणी जेपीसी स्थापन करण्याच्या मुद्यावर काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे हे विधान समोर आले आहे. शरद पवारांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अदानींना टार्गेट केले जात असल्याचा दावा केला होता.
त्यानंतर शनिवारी दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिल्लीत स्पष्टीकरणही दिले होते. ते म्हणाले -‘माझी मुलाखत अदानींवर नव्हती. त्यात मला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात मी जेपीसी का नको हे सांगितले.’