• Wed. Apr 30th, 2025

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चोरांचा सुळसुळाट…

Byjantaadmin

Apr 6, 2023

अहमदाबाद : गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा चोरांचा मोठा अड्डा झाल्याचे आता समोर येत आहे. आयपीएलचा पहिला सामना हा याच स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. पण या सामन्यात चोरांनी जोरदार हातसफाई केल्याचे आता समोर आले आहे. कारण गुजरात पोलिसांकडे आता बऱ्याच तक्रारी या सामन्यानंतर आल्या आहेत.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलची ओपनिंग सेरेमनी झाली होती. त्यावेळी हे स्टेडियम हाऊसफुल्ल होते. हा सामान पाहण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त चाहते उपस्थित होते. पण हा सामना संपल्यावर मात्र प्रेक्षकांना फारच वाईट अनुभव आला आहे. कारण हा सामना संपल्यावर आपला मोबाईल लंपास झाल्याचे या चाहत्यांना समजले आणि त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या उद्घाटन सामन्यात १५० मोबाईल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. यामध्ये अनेक तक्रारदारांनी ईएमआयवर आयफोन घेतल्याचे सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, १५० लोकांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे पण अजून काही लोक असू शकतात ज्यांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. या परिस्थितीत हा आकडा आणखी वाढू शकतो. आयपीएलची नरेंद्र मोदी स्टेडियमची रंगतदार सुरुवात झाली. यामध्ये रश्मिका मंदानाने तिच्या ‘पुष्पा द राइज’ या सुपरहिट चित्रपटातील हिट गाण्यावर आपली अदाकारी पेश केली. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरले होते. गायक अरिजित सिंग, अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी उद्घाटन सोहळ्यात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रश्मिका मंदानाचा परफॉर्मन्स आणि आयपीएलचा ज्वर मोठ्या उंचीवर होता. या गोष्टीचाच फायदा चोरांनी यावेळी घेतला आणि प्रेक्षकांच्या मोबाईलवर चोरट्यांनी हात साफ केला.त्यानंतर पोलिसाांकडे मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अहमदाबाद पोलीस या पुढील ९ एप्रिलच्या सामन्यासाठी मोबाईल चोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी विशेष सतर्कतेची तयारी करत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरी करण्यात संघटित टोळीची भूमिका असण्याचीही भीती व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात आयफोन चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. यानंतर मोबाईल चोर नेमका कुढे आहे हे शोधण्याचा चाहत्यांनी प्रयत्न केला. यानंतर ज्यांचा मोबाईल चोरी झाला आहे त्यांनी मदतीसाठी नवरंगपुरा आणि शास्त्रीनगर येथील अॅपल स्टोअरही गाठले होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे या चाहत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी यावेळी ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण हे चोर कधीकधी इतर डिव्हाइसेस आणि फोनवर लिंक पाठवतात. त्यावर क्लिक केल्यास मोबाईलचा पासवर्ड मिळण्याची शक्यता आहे. अशा बोगस लिंक्सपासून सावध राहण्याची गरज आहे,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed