अस्वस्थता हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे – डॉ. सोमनाथ रोडे
निलंगा: जे आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्नांकडे, समाजस्थितीकडे पाहून अस्वस्थ होत नाहीत अस्वस्थ होत नाहीत ते माणूस आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण अस्वस्थता हे मानवी स्वभावाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, जातीयता, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील दिवसाढवळ्या होणारे अत्याचार, विधवांच्या समस्या त्यांना दिला न जाणारा सन्मान या सर्व प्रश्नांकडे पाहून युवतींनी अस्वस्थ झाले पाहिजे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे आयोजित विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी अजूनही अनेक प्रश्न ज्वलंत आहेत. देशात जवळपास ५० टक्के स्त्रियांची लोकसंख्या असूनही संसदेपासून इतर अन्य महत्वाच्या प्रशासकीय पदांवर महिलांची सदस्य संख्या आजही संख्येच्या प्रमाणात नाही. समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही सुधारलेला नाही. या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर युवतींनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी आपले आदर्श आपण ओळखायला हवे. आपल्यातील स्त्री असल्याचा न्यूनगंड बाजूला सारून आपण पुढे आले पाहिजे. पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी केलेला त्याग, स्वातंत्र्य चळवळीत अनेक तरुण स्त्रियांनी दिलेले बलिदान आपण लक्षात घेतले पाहिजे. या कार्यशाळेतून आपण या गोष्टी शिकून आपल्या पुढे असलेल्या आव्हानांवर मात करण्याची उर्मी घेऊन गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक, डॉ. मल्लिकार्जुन करजगी हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना युवतींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला पाहिजे. बालविवाहाची समस्या, पाणीप्रश्न अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीचे प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यात आपण मोलाचा वाटा उचलला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थीनीना ही कार्यशाळा म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व विकासाठी महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार केले तर आभार डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले. रासेयोची विद्यार्थिनी कु. सुषमा बेलकुंदे व सौदागर जस्मिन यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. रासेयोचे विभागिय समन्वयक डॉ. सुनील गरड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. धनंजय जाधव , रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा विश्वनाथ जाधव, डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. नरेश पिनमकर, प्रा. शिवरुद्र बदनाळे, डॉ. गोपाळ मोघे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यापिठ परीक्षेत्रातील रासेयो स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तीन दिवसीय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थीनीना विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.