• Wed. Oct 15th, 2025

कर्तृत्ववान महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’ एक अभिनव उपक्रम -खासदार डॉ. शिवाजी काळगे

लातूर प्रतिनिधी,-लातूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विलासराव देशमुख
फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला ‘महिला उद्योजिका व्ही.
डी. एफ. बाजार’ हा एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन लातूरचे खासदार
डॉ. शिवाजी काळगे यांनी केले आहे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंन्टीवन
ॲग्री लि.च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित
करण्यात आलेल्या ‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’चा शुभारंभ मंगळवार, १४ ऑक्टोबर
२०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि
डॉ. सविता शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती

यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. सविता शिवाजी काळगे, लातूर
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव,
माजी महापौर स्मिता खानापूरे, महिला काँग्रेस अध्यक्ष शीलाताई पाटील, राजाभाऊ जाधव,
प्राचार्य बालाजी वाकूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बचत गटातून महिला सक्षमीकरण

यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून बचत
गटातील महिला उद्योजकांना ‘व्ही. डी. एफ. बाजार’च्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ
मिळाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उद्योजिका महिला एकत्र येऊन व्यवसाय करत आहेत,
हे कौतुकास्पद आहे.
ते पुढे म्हणाले की, “लातूर जिल्ह्यात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत, ज्या उद्योगातून
निश्चितच राज्यात आणि देशात नाव करतील.” बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे खऱ्या
अर्थाने सक्षमीकरण होत आहे. विलासराव देशमुख फाउंडेशन गेल्या अनेक दिवसांपासून
लातूरकरांसाठी चांगले विधायक कार्य करत आहे. भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी सर्वतोपरी
सहकार्य करण्याची ग्वाही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून
दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. सविता शिवाजी
काळगे आणि मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ‘व्हीडीएफ. बाजार’चा शुभारंभ करण्यात आला.
मान्यवरांनी यावेळी बचत गटांच्या सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली आणि विविध वस्तूंची
खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत समन्वयक संगीता मोळवणे, शीतल
फुटाणे, ॲड. सुनंदा मोटे, सोनाली थोरमोटे, प्रा. उर्मिला मुगळे पाटील, कवीता वाडीकर,
चंद्रज्योती बिरादार आणि प्रीतम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मोळवणे
यांनी केले, सूत्रसंचालन राहूल इंगळे पाटील यांनी, तर आभार प्रीतम जाधव यांनी मानले.
यावेळी प्रवीण सूर्यवंशी, शरद देशमुख, ख्वाजाबानू बुऱ्हान, अविनाश देशमुख, गोविंद
देशमुख, प्रवीण कांबळे, यशपाल कांबळे, सत्यवान कांबळे, सुलेखा कारेपूरकर आदींसह विविध
संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या एनएसएस
विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी पथनाट्य सादर केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या
प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *