विलासराव देशमुख फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम । १३० महिलांचा सहभाग
‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या लता पाटील
लातूर प्रतिनिधी : खास दिवाळीच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी विलासराव देशमुख
फाउंडेशन, लातूरच्या वतीने दोन दिवसीय ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ चे आयोजन
करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दि. १४ रोजी झाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘खेळ
पैठणीचा’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या प्रथम विजेत्या ठरल्या लता
पाटील. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन
अॅग्री लि.च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘महिला उद्योजिका
व्ही. डी. एफ. बाजार’ हा उपक्रम साकारला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लातूर शहरातील व
जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उद्योजिकांना मोठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यात
आली आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या बाजारात महिलांनी तयार केलेल्या गृह उपयोगी
वस्तू, खाद्यपदार्थ, हस्तकला, मसाले, तयार कपडे आणि विविध प्रकारचे दिवाळी साहित्य यांचे
भव्य प्रदर्शन व विक्री होत आहे.
या दरम्यान ‘खेळ पैठणीचा’चे सुत्रधार प्रसाद मोटे यांनी खुप रंगतदारपणे हा कार्यक्रम
रंगवला. यात १३० महिला सहभागी झाल्या होत्या. विविध खेळ, विविध प्रश्न, विविध स्पर्धाच्या
माध्यमातून या कार्यक्रमाने महिलांचा उत्साह द्विगुणीत केला. या स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम
विजेत्या ठरल्या लता पाटील. याशिवाय रोहिणी क्षीरसागर, रुक्मिणी इंगोले, रंजना कलवले,
अश्विनी खुडे या चार महिलांना उत्तेजनार्थ पारितोषीके देण्यात आली.
यावेळी संगीता मोळवणे, अॅड. सुनंदा मोटे, सोनाली थोरमोटे, प्रितम जाधव, अनुष्का
बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
