दिवाळीमध्ये खाजगी बसचालकांनी जास्त भाडे आकारल्यास ऑनलाईन तक्रार करण्याचे आवाहन
लातूर, (जिमाका): दिवाळी सणानिमित्त राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गावी येत-जात असल्याने खाजगी प्रवासी बसेसची मागणी वाढली आहे. यानिमित्त काही खासगी बसचालकांकडून मनमानी भाडेवाढ आकारण्याची शक्यता आहे. प्रवाशांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी जारी निर्णयानुसार खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. या भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) समान प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतूक प्रती किलोमीटर भाडेदरापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाहीत.

या नियमानुसार वाजवीपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बस चालकांविरुद्ध नागरिकांनी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालाच्या [email protected] या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी. या तक्रारीमध्ये प्रवास कोठून कुठपर्यंत केला, तिकिटाची प्रत, वाहनाचा क्रमांक आदी तपशील नमूद करावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.