• Tue. Apr 29th, 2025

मालेगावात मुस्लीम समुदायाबरोबर जोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

Byjantaadmin

Mar 27, 2023

मालेगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत हिंदुत्वाची भूमिका प्रभावीपणे मांडतानाच मुस्लिमबहुल मालेगावात आयोजित सभेतील विरोट जनसुमदाय पाहून सुखावलेल्या ठाकेर यांनी मुस्लीम समुदायास पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात खरी शिवसेना कुणाची यावरून न्यायालयीन वाद सुरू आहे. न्यायालयाबाहेरही या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोकणातील खेड येथे पहिल्यांदा सभा घेत शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर ठाकरे यांची दुसरी सभा ही मालेगावात पार पडली. सभेसाठी मुस्लिमबहुल मालेगावची निवड करतानाच खेडपेक्षाही ही सभा मोठी करण्याचे ठाकरे गटाचे मनसुबे होते. जवळपास लाखभर लोकांची या सभेस लाभलेली उपस्थिती बघता ठाकरे गटाचे मनसुबे फळास आल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आली होती. मालेगाव महापालिकेत मात्र त्यापूर्वी २०१७ मध्येच काँग्रेस व शिवसेना घरोब्याचा प्रयोग झालेला होता. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर करोना संकट आले. त्यावेळी मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे प्रमुख केंद्र बनले होते. या संकट काळात मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी दाखविलेल्या संवेदनेमुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली. तेव्हापासून मुस्लिम समुदायातही ठाकरेंची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष वाढीसाठी त्याचा लाभ उठविता येऊ शकतो, अशी खूणगाठ बांधत ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु आहेत.

खेड येथील सभा ही विराट होती तर मालेगावची सभा ही अथांग आहे, अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्यांनी या सभेचे वर्णन केले. सभेस मुस्लिम समुदायाची उपस्थितीदेखील लक्षणीय होती. सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. सायंकाळी मुस्लिम बांधवांचे रोजे सोडण्याची वेळ असते. त्यामुळे अनेकांना सभेस उपस्थित राहता आले नाही. अन्यथा या सभेस आणखी गर्दी झाली असण्याची शक्यता होती. या सभेच्या नियोजनासाठी खासदार संजय राऊत हे सभेपूर्वी तीन दिवस मालेगावात तळ ठोकून होते. या काळात विविध समाज घटकांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुध्द आघाडी उघडणाऱ्या राऊत यांना मुस्लिम वस्त्यांमध्येही भेटीचे निमंत्रण दिले गेले. यावेळी मुस्लिम समुदायातही उत्स्फूर्त स्वागत केले गेल्याने राऊत हे भारावून गेले. या सभेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच ठाकरेंच्या स्वागतासाठी मालेगावात अनेक ठिकाणी उर्दू भाषेत फलक झळकल्याचे दिसले.

सभेत UDHAV THAKRE यांनी जवळपास अर्धा तास केलेल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटावर प्रहार केले. मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग करूनCONGRESS  राष्ट्रवादीशी ठाकरे यांनी घरोबा केला, असा भाजपकडून जो आरोप केला जातो, त्याचाही ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. आपण हिंदुत्व सोडले,असा एक तरी पुरावा दाखवा, असे आव्हानच ठाकरे यांनी यावेळी दिले. प्रबोधनकार व बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाच्या विचारावर आपण पुढे जात असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. इतकेच नव्हे तर भाजपच्या व्यासपीठावर कधीकाळी साधुसंत दिसायचे, आता संधी साधूंची गर्दी वाढत आहे,असा टोला लगावत खऱ्या हिंदुत्वापासून भाजपच आता फारकत घेत असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशप्रेमाविषयी शंका घेणारे वक्तव्य करत असतानाही ठाकरे हे त्यांच्याविरुध्द का बोलत नाही, अशी टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्याचाही प्रयत्न त्यांनी राहुल गांधींना सुनावत केला. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदींविरुध्द लढा उभारायचा असेल तर, सावरकरांचा अपमान करण्याची चूक राहुल गांधी यांनी करू नये, असा सल्ला देण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला.

 

भुसे यांचा थेट उल्लेख टाळला

या सभेच्या तोंडावर खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर १७८ कोटीचा शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला होता. यावरून उभय गटात वादंग निर्माण झाले होते. त्यामुळे ठाकरे हे या सभेत भुसे व शेजारच्या नांदगाव मधील आमदार सुहास कांदे यांच्यावर काय तोफ डागतात, याविषयी उत्कंठा निर्माण झाली होती. परंतु, ठाकरे यांनी सभेत उभयतांचा प्रत्यक्ष उल्लेख टाळला. खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात ढेकणाला मारण्यासाठी तोफेची काय आवश्यकता, असा प्रश्न उपस्थित केला. तर कांद्याला भाव नसल्याने शेतकरी दुःखी झाले आहेत, हा संदर्भ देत ठाकरे यांनी गेल्या वर्षी इकडचा एक कांदा विकला गेला,असे म्हणत आमदार सुहास कांदे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed