• Thu. May 1st, 2025

मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवांमध्ये खडाजंगी

Byjantaadmin

Oct 10, 2022

कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव खतगावकर यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे समोर येत आहे. शिंदे सरकारला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्तानं मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेण्याचे काम सुरू असतानाच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली. या प्रकारामुळे एकनाथ शिंदेदेखील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांचे सचिव खतगावकर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, अब्दुल सत्तार यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येत असतानाच हा वाद झाला. यादरम्यान मंत्री सत्तार एवढे भडकले की त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच त्यांचे खासगी सचिव असलेल्या खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे.

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांना खडेबोल सुनावले. या वादानंतर बैठकीतील काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी मध्यस्थी केली. मंत्र्यांनी वादाचा विषय नंतर सोडवता येईल, अशी सत्तारांची समजूत घातल्याची माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यस्थी केली. मात्र, संतापलेले अब्दुल सत्तार रागारागातून बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री शिंदे नाराज

या सर्व घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या 100 दिवसांत जे निर्णय घेतले आहेत, ते जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमदार, मंत्री यांच्यावर देण्यात आली आहे.

भाजपने या सर्व घटनेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, अब्दुल सत्तार संयमी नेते आहेत. ते शिवीगाळ किंवा असे काही करतील असे वाटत नाही. बैठकीत त्यांच्याकडून कदाचित काही चुकीचे वाक्य गेले असेल तर माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *