लातुर जिल्ह्यातील हासोरी भागांत मागील अनेक दिवसापासून भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवत आहेत. काल मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटाला 2.1 रीश्टर स्केलचा धक्का बसला होता. काल (सोमवार) रात्री 9 वाजून 57 मिनिटाला 1.9 रीश्टर स्केलचा धक्का जाणवला आहे. यात हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा ह्या मुख्य गावासह या परिसरातील अनेक गावांना धक्का जाणवला आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील (Latur District) भूकंपमापन केंद्रात या भूकंपाची हालचाल नोंदवण्यात आली आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आली आहे.
आधी आवाज आता भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरि हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे. कारण या गावात सतत जमिनीतून आवाज येत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांच्या मतानुसार हे भूकंपाचे धक्के होते. मात्र प्रशासनाने भूगर्भातील हालचालीमुळे जमिनीतून आवाज येत आहे असं सांगत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.
प्रशासकीय पातळीवर यंत्रणा हलली. अनेक पथकांनी हासोरी या गावाला भेटी दिल्या. दिल्ली येथील पथक दाखल झालो होते. याच काळात या भागात पुन्हा एकदा धक्के जाणवले. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.
भूगर्भातील ते आवाज म्हणजे भूकंपच होते हे पत्रकार परिषद झाल्यानंतर समोर आले. त्यानंतर आवाजाची आणि धक्क्याची मालिका काही काळ सुरूच होती.
जवळपास दहा ते पंधरा दिवसाच्या फरकानंतर मागील 24 तासांत हासोरी भागात भूकंपाचे दोन धक्क्याची नोंद झाली आहे. काल मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटाला 2.1 रीश्टर स्केल आणि आज रात्री नऊ वाजून 57 मिनिटाला 1.9 रीश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. हासोरी आंबुलगा पिरपटेलवाडी येथील ग्रामस्थ आजमीतिला त्रस्त आहेत. घरात राहता येत नाही आणि बाहेर सतत पाऊस अशा संकटात येथील ग्रामस्थ सापडले आहेत. प्रशासनाने तात्काळ यातून मार्ग काढावा अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे.