भाजपला २०१४ च्या निवडणुकीत २९ टक्के तर शिवसेनेला १९ टक्के मते पडली होती. त्यात शिवसेनेच्या Shivsena मतांपैकी आठ ते दहा टक्के मते हिंदुत्ववादी होती. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ती हिंदुत्ववादी मते भाजपकडे वळवण्यावर आम्ही लक्ष आहे. ती मते वाढल्यास राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे Vinod Tawde यांनी केला.
लोकसभा प्रवास योजनेतंर्गत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. तावडे आज कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपच्या कार्यकारणीची बैठक घेतली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या पुढील रणनीतीवर चर्चा केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल भोसले, प्रदेश चिटणीस विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, लोकसभा प्रवास योजनेमध्ये 40 केंद्रीय मंत्री सक्रियपणे प्रवास करत आहेत. केंद्राच्या योजनांवर नागरीकांचा काय प्रतिसाद आहे, याचा आढावा घेत आहेत. तो अहवाल केंद्राकडे पाठवला जात आहे. राज्यातील 48 पैकी 18 ठिकाणच्या लोकसभा मतदार संघात नियोजन सुरू आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने सेनेने हिंदूत्वाची मते खिळखिळी केली आहेत आणि नेमकी हीच मते भाजपकडे वळावी याकडे आमचे लक्ष आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्या सभेनंतर त्यांचे हिंदुत्व आक्रमक झाले आहे का, यावर श्री. तावडे म्हणाले, सभेत भूमिका घेतल्यास मते फिरतील असे आता वाटत नाही. भाजप मनसे युती होईल, अशी शक्यता सध्या तरी धूसर आहे. भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात रान उठवत असून दुसरीकडे कऱ्हाड बाजार समितीच्या निवडणुकीत स्थानिक भाजप राष्ट्रवादीशी जवळीक करताना दिसत आहे या प्रश्नावर श्री. तावडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणूका पक्ष चिन्हावर होत नाही त्यामुळे त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.