नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, सिद्धरामय्या यांना कोलारऐवजी वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धरमय्यांच्या समर्थकांच्या नाराजीचा काँग्रेसला सामना करावा लागू शकतो.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक तोंडावर असून काँग्रेस पक्षाला वातावरण अनुकूल असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही त्याचा अनुभव आला होता. त्यामुळे काँग्रेसने आपली तयारी जोरदारपणे केली आहे. त्यातून काँग्रेस पक्षाकडून १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात शिवकुमार, सिद्धरमय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री के सिद्धरमय्या यांना कोलार मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्याऐवजी वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसमध्ये मतभेद उफाळून येण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. सिद्धरमय्या यांना काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना केली, त्यानुसार त्यांनी कोलारमधून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.
सिद्धरमय्या यांच्या त्या निर्णयानंतर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले होते. सिद्धरमय्या यांनी कोलारमधूनच निवडणूक लढवावी. आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू, असे सांगितले होते. त्याचवेळी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरमय्या हे कोलारमधूनच निवडणूक लढवतील, असे जाहीर केले होते.
विधानपरिषदेचे माजी उपसभापती सुदर्शन यांनीही सिद्धरमय्या हे कोलारमधूनच निवडणूक लढवतील यात कुठलाही शंका नाही. विरोधकांकडून जाणून बुजून अपप्रचार केला जात आहे, असे स्पष्ट केले होते. पहिल्या यादीत सिद्धरमय्या यांना कोलारऐवजी वरुणा या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.