• Wed. Apr 30th, 2025

निलंगा औराद मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Byjantaadmin

Mar 25, 2023

लातूर: मुलीच्या लग्नाची तारीख काढायला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. निलंगा औराद मार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली, हा अपघात इतका भीषण होता की कारची झालेली अवस्था पाहून अंगावर काटा उभा होईल.काळाने घाला घातलेलं लातूर जिल्ह्यातील चाकुरमधील हे साळवे कुटुंब. आपली लाडकी मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात जावी, सासरची प्रेमळ माणसं असावीत, तिचा संसार सुखी व्हावा असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा. हीच स्वप्न साळवे दांपत्यानेही रंगवली होती.

latur family accident

मुलीसाठी जसं कुटुंब हवं होतं तसं त्यांना मिळालं आणि सोयरिक ठरली. आता मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायची होती. त्यासाठी ते कारने निघाले होते. मात्र, कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात मुलीच्या बोहल्यावर चढण्याची स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांसह साळवे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकून तिला सासरी पाठवण्याचं स्वप्न अधुरं ठेवून साळवे दाम्पत्याने या जगाचा निरोप घेतला.
हा अपघात किती भीषण होता हे तुम्हाला फोटोंवरुन लक्षात येईलच. फोटोत दिसत असल्याप्रमाणे कार रस्त्याच्या बाजूला पलटलेली आहे. ही कार इतक्या जोरात आपटली गेली की तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पुढील चाकं निघाले आहेत. कारचे सर्व दारं तुटली आहेत, तर टप्परही पूर्णपणे चपकलं आहे. या कारची अवस्था पाहून ज्या दोघांचा जीव वाचला आहे त्यांचं दैव बलवत्तर मानावं लागेल, इतका भीषण हा अपघात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *