गुजरातच्या एका न्यायालयाने मानहाणी प्रकरणी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने तडकाफडकी कारवाई करत राहुल यांची खासदारकी रद्द केली आहे. याचे तीव्र पडसाद देशासह महाराष्ट्रात दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी एका बॅनरद्वारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर राहुल गांधींसारखी केव्हा करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
काय आहे बॅनरमध्ये?
“राहुल गांधींना काल सुरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि आज खासदारकी रद्द… सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखाच असला पाहिजे,” असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
“अपना भिडू बच्चू कडू. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. अदानीराज, हुकूमशाही, लोकशाही वाचवा, द्वेशाचे राजकारण,” असेही या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे.
बच्चू कडू म्हणाले – हा निव्वळ मूर्खपणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बॅनरविषयी एका वृत्तवाहिनीने बच्चू कडू यांना छेडले असता ते म्हणाले -“हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे पोस्टर अज्ञानपणातून लावण्यात आलेत. मला 2 कलमांतर्गत शिक्षा झाली. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली. त्यामुळे राहुल गांधींना लागू झालेला नियम मला लागू होत नाही. विरोधकांना कोणतेही काम उरले नाही. ही सगळी अज्ञानतेची लक्षणे आहेत.”