• Wed. Apr 30th, 2025

मोसंबीचा गोडवा वाढविण्यासाठी इसारवाडीचे सिस्ट्रस इस्टेट

Byjantaadmin

Mar 25, 2023

मराठवाड्यात मोसंबी, केसर आंबा व सीताफळ या फळपिकांना (GIS) भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. कृषीप्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आर्थिक प्रगती साध्य करावी. फळपीकांना योग्य बाजारभाव उपलब्ध व्हावा म्हणून उत्पादन ते विपणन ही श्रृंखला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याच प्रयत्नाचे प्रत्यक्ष स्वरुप इसारवाडी ता. पैठण येथील सिट्रस इस्टेट हे होय.

असे आहे सिट्रस इस्टेट

क्षेत्र तालुका बीज गुणन केंद्र, इसारवाडी, ता. पैठण जि. औरंगाबाद येथे एकूण क्षेत्र 22.50 हेक्टर गट नं. 85 व 87 मध्ये असुन त्यापैकी 4.50 हे. क्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स व उर्वरित 18.00 हे. क्षेत्रावर सिट्रस इस्टेट इसारवाडी येथे मंजुर झाले आहे. या प्रकल्पाचा खर्च 43 कोटी 79,लाख 07 हजार 700रुपये इतका आहे. त्यापैकी 22 कोटी 32 लाख 64 हजार रुपयांचा निधी शासनाने वितरीतही केला आहे.

मोसंबी उत्पादकांना लाभ

महाराष्ट्रात एकूण 57243 हेक्टर क्षेत्र आहे. यातील मराठवाडा विभागाचे 39370 हेक्टर असून औरंगाबाद जिल्ह्याचे एकूण 21525 हेक्टर क्षेत्र आहे. लगतच्या जालना जिल्ह्याचे मोसंबीचे 14325 हेक्टर क्षेत्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  

सिट्रस इस्टेटची वैशिष्ट्ये

  • मोसंबी ची जातीवंत, रोग व किडमुक्त उच्च दर्जाची कलमे निर्माण करण्यासाठीआधुनिक रोपवाटिका
  • मोसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रोक्त लागवड पद्धतीचा प्रचार, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पिक प्रात्याक्षिकावर भर
  • मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करुन उत्पादकतेत वाढ
  • सभासद शेतकऱ्यांना मोसंबी पिकांच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यांत्रिकीकरणात (अवजारे बँकेच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
  • मोसंबी फळप्रक्रिया, संकलन, ग्रेडींग, पॅकेजिंग, साठवण, मार्केटींग व निर्यातीला चालना देणे.
  • इंडो- इस्त्राईल तंत्रज्ञानाचा प्रसार करून उत्पादकतेत वाढ करणे
  • मृदा व पाणी परीक्षण, उती व पाने पृथ्थकरणासाठी प्रयोगशाळा स्थापन करून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा उपलब्ध करून देणे.
  • निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात निविष्ठा उपलब्ध करून देणे

समन्वयासाठी समिती

 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यात कार्यकारी समिती सदस्य, सर्व सभासद शेतकरी यांचा समावेश असणार आहे. तसेच सदस्य सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी, सिट्रस इस्टेट असून सदस्य जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर, जिल्हा पणन अधिकारी,  विभागीय व्यवस्थापक, कृषी उद्योग अग्रणी महामंडळ, महाऑरेंज नामनिर्देशित  प्रतिनिधी, यांच्यासह मोसंबी उत्पादक पाच शेतकरी इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर दैनंदिन तांत्रिक, प्रशासकीय कामकाजाची समन्वयनाची जबाबदारी  आहे.

औरंगाबाद सह मराठवाडा विभागातील फळ उत्पादनात महत्वाची भूमिका ही मोसंबी पार्कची राहणार आहे.परदेशात निर्याती बरोबरच अन्न प्रक्रिया उत्पादनात आमूलाग्र बदल यामुळे नक्कीच घडतील. उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, ग्रेडींग, पँकीग, कोल्ड स्टोरेज आणि साठवण या सुविधा उपलब्ध असणार आहे.

स्टोरेज, अवजारे बँक, फलोत्पादन तज्ज्ञ, वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ, कीटकशास्त्र तज्ज्ञ, माती परीक्षण तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्या सेवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधा या सिट्रस इस्टेटमार्फत दिल्या जाणार आहेत.

सेंटर ऑफ एक्सलन्सची ध्येय्ये

तसेच, सेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) अंतर्गत इंडो इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये कलम काडीच्या आठ जातीची एकूण 154 झाडे, तर मूलकांडच्या तीन जातीची एकूण 80 झाडे असतील. ४.५० हेक्टरवर असलेल्या या सेंटरचा एकूण खर्च १२ कोटी ८३ लाख ५४ हजार एवढा असेल. निर्यातक्षम फळ बागांची वाढ करणे, प्रति हेक्टर ३० टनापर्यंत उत्पादकता वाढविणे, गुणवत्ताधारक रोपांची निर्मिती करणे, आदर्श रोपवाटिकांची स्थापना करणे, काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, यांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे ही या सेंटरची ध्येय आहेत.

याशिवाय रोग व्यवस्थापन करणे, विविध वाणांची शिफारस करून उत्पादनात वाढ करणे, निर्यातयोग्य वाणांचा विकास करणे, पॅकिंग, प्रक्रिया यासारख्या काढणीत्तोर व्यवस्थापनावर भर देणे, कोल्ड स्टोरेजची उभारणी करून साठवण क्षमता वाढविणे, भौतिक व रासायनिक गुणधर्म योग्य असलेली जमिनीची निवड, कीड व रोग यांचे एकात्मिवक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दीष्टे आहेत.

सीट्रस इस्टेट अंतर्गत क्षेत्रात रंपूर लाइम, न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले – मोसंबी ही मातृवृक्ष असणार आहेत. या सेंटरची मोसंबी फळ पिकाची जातीवंत, रोग व कीडमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करणे, मोसंबीच्या दर्जेदार उत्पादन व शास्त्रोक्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक देणे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, मोसंबी पिकाच्या व्यवस्थापन, फळ प्रक्रिया, ग्रेंडिंग, पॅकेजिंग, साठवण, मार्केटिंग व निर्यातीला चालना देणे, इंडो इस्राईल तंत्रज्ञानाने उत्पादकता वाढविणे, मृद व पाणी परीक्षण, ऊती व पाने पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा तसेच निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा देणे ही या सीट्रस इस्टेटची उद्दीष्टे आहेत. पायाभूत सुविधा तयार करणे, यांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देण्यात येणार आहे.

 

डॉ. मीरा ढास,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *